Regd. No. Mum/00201/2501/NA

Latest News

Organ Donation is a gift for life
Latest News

रक्तगट भिन्न  असूनही _किडनी प्रत्यारोपण

# नायर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून केली किमया

# पती ‘ओ पॉझिटिव्ह’ तर पत्नी ‘ बी पॉझिटिव्ह’ तरीही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली यशस्वी

# सलग ४ तासांच्या शस्त्रक्रिया

मुंबई: नायर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी भिन्न रक्तगट असलेल्या पत्नीची किडनी पतीच्या शरीरात प्रत्यारोपित करून त्याला जीवनदान देण्याची किमया केली. या घटनेला आठ महिने उलटले आहेत. किडनीदान करणारी पत्नी व किडनी प्रत्यारोपित केलेली ती व्यक्ती आजही ठणठणीत आहेत. त्यामुळे नायर रुग्णालयाने आरोग्य क्षेत्रात सुवर्णअक्षरांनी आपले नाव कोरले आहे. एक वेगळाच इतिहास घडून मुंबई महापालिकेचे नाव उंचावले आहे.
लग्न विधी अंतर्गत पती- पत्नी एकमेकांचे कायमस्वरूपी जीवनसाथी होतात. पती आपल्या पत्नी व कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेतो. तर पत्नी ही त्याची अर्धांगिनी होते. या कलियुगात पत्नीने आपला अर्धांगिनी होण्याचा धर्म अत्यंत चोखपणे बजावल्याची घटना मुंबईतील नायर रुग्णालयात घडली आहे.
आठ महिन्यापूर्वी ‘ओ पॉझिटिव्ह’ रक्तगटाच्या एका चाळीस वर्षीय व्यक्तीची किडनी खराब झाली. त्याला वाचविण्यासाठी समान रक्तगट असलेल्या व्यक्तीची किडनी प्रत्यारोपित करणे तातडीचे व अत्यावश्यक होते. मात्र त्याच्या पत्नीने पतीचा जीव वाचविण्यासाठी तिचा रक्तगट ‘ बी पॉझिटिव्ह’ असतानाही किडनीदान केली. पुढचे अवघड काम म्हणजे ‘ती’ किडनी नायर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वीपणे त्या रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करून दाखवली.किडनी प्रत्यारोपणातील अडचण
वास्तविक, किडनी प्रत्यारोपण विषयक नियमांनुसार जवळच्या नातेवाईकांपैकी ज्यांचा रक्तगट समान आहे, अशा एका व्यक्तीची किडनी प्रत्यारोपित करणे शक्य असते. वैद्यकीय शास्त्र आणि नियमानुसार, त्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आई, वडील, भाऊ, बहिण आणि बायको यांचा समावेश होतो. यापैकी आई, वडिल आणि भावाचा रक्तगट जरी समान होता; तरी आईच्या किडनीची कमी असणारी कार्यक्षमता, वडिलांचे वय आणि भावाच्या वैयक्तिक कारणामुळे त्यांची ‘किडनी प्रत्यारोपित’ करणे शक्य नव्हते. तर रक्तगट ‘बी पॉझिटिव’ असणाऱ्या रुग्णाच्या पत्नीला तिची एक किडनी पतीला देण्याची इच्छा होती. मात्र, रक्तगट समान नसल्याने पत्नीची किडनी पतीला प्रत्यारोपित करण्यात अडचणी होत्या.
पत्नीची जिद्द कामी आली,
‘शस्त्रक्रिया’ पार पडली
मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारत याबाबत वैद्यक शास्त्रातील प्रगत पद्धतींनुसार आणि भिन्न रक्त गटातील व्यक्तींच्या ‘किडनी ट्रान्सप्लांट’ विषयक वैद्यकीय उपचार क्रमानुसार (As per medical protocol) संबंधित बाबी अमलात आणल्या. त्यानंतर २ मार्च २०२० रोजी सलग ४ तास ‘किडनी’ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नायर रुग्णालयातच पार पडली. या शस्त्रक्रियेदरम्यान पत्नीची एक किडनी काढून ती पतीला प्रत्यारोपित करण्यात आली. विसंगत रक्तगट असूनही ‘किडनी प्रत्यारोपण’ करण्याची ही मुंबई महापालिका रुग्णालयांतील पहिलीच शस्त्रक्रिया होती
रक्तगट भिन्न असूनही ‘किडनी प्रत्यारोपण’ करण्याच्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुरुवातीचे ६ महिने अत्यंत काळजी घ्यावी लागते. ही शस्त्रक्रिया होऊन आता ८ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असल्याचे आता म्हणता येईल, असे नायर रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांनी सांगितले आहे. या शस्त्रक्रियेमुळे पती-पत्नीच्या प्रेमाला एक नवा आयाम मिळण्यासोबतच जवळच्या नात्यात रक्तगट भिन्न असूनही ‘किडनी प्रत्यारोपण’ करणे आता शक्य असल्याने अनेक गरजूंना आशेचा एक नवा किरण दिसला आहे.

डॉ. भारमल यांच्याकडून त्या डॉक्टरांचे अभिनंदन
भिन्न रक्तगटांमधील ‘किडनी प्रत्यारोपण’ शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याबद्दल महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉक्टर रमेश भारमल यांनी नायर रुग्णालयातील संबंधित सर्व डॉक्टरांचे आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या चमूचे अभिनंदन करत सदर चमूला शुभेच्छा दिल्या आहेत. ही शस्त्रक्रिया करणाऱ्या चमूमध्ये मूत्रपिंड रोग उपचार विभागाच्या (Nephrology Dept.) प्रमुख प्रा. डॉ. कल्पना एस मेहता, मूत्रपिंड शल्यचिकित्सा विभागाचे (Urology Dept.) प्रमुख प्रा. डॉ. एच. आर. पाठक, भूलशास्त्र विभागातील (Anaesthesiology Dept.) प्रा. डॉ. लिपीका बलिअरसिंग इत्यादी तज्ज्ञ डॉक्टरांचा प्रामुख्याने समावेश होता