Regd. No. Mum/00201/2501/NA

In Heaven

Don't take your organ to heaven ,heaven knows they need it here.
In Heaven

स्नेहलताताई मोरेश्वर वझे

शतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या श्रीमती स्नेहलता मोरेश्वर वझे  यांची स्वातंत्र्य चळवळीपासून ते शतकापर्यंतची वाटचाल-
पंजाब राज्यातील जालंधर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या प्रेमळ व मध्यमवर्गीय कुटुंबात श्री हरदत्त शर्मा उर्फ बाबूजी यांच्या घरी स्वातंत्र्या पूर्वी पहिल्या मुला नंतर एका गोंडस मुलीचा जन्म झाला. मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मी असे आपण म्हणतो त्यामुळे घरात एकदम आनंदाचे वातावरण होते.
आपल्या मुलीचा नामकरण संस्कार करण्यासाठी पत्रिका तयार करण्यास बाबूजींनी पंडितजींना सांगितले. तारीख व वेळ सांगितल्यानंतर, लहान मुलीची ग्रहदशा बघून, पंडित जी एकदम स्तब्ध झाले. शर्माजी व सर्व कुटुंबीय पंडितजींकडे एकटक बघत राहिले. काय चालू आहे काही कळायच्या आत अगदी गंभीरपणे पंडितजी म्हणाले, "क्यू आप इनकी जनम कुंडली बना रहे हो? यह लडकी कुछ ज्यादा दिन की मेहमान नही है". तरीही पंडितजींनी नाव काढून बाबूजी आणि त्यांच्या पत्नीकडे मुलीच्या नावाची चिठ्ठी दिली. आई-वडिलांनी मुलीचे नाव ठेवले स्नेहलता. स्नेहलता या नावाचा अर्थ असा आहे की स्नेह म्हणजे प्रेम आणि लता म्हणजे वेल, प्रेमाचा वेल. स्नेहलताताईंच्या बाबतीत आपल्याकडील दोन प्रचलित म्हणी आठवतात. एक म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि दुसरी देव तारी त्याला कोण मारी. स्नेहलताताईंच्या बाबतीत या दोन्ही म्हणी अगदी तंतोतंत लागू पडतात. त्याचे कारण की ह्या सर्व षडरिपूंवर यशस्वीपणे मात करून त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले.
स्वातंत्र्य पूर्वीचा काळ असल्याने सगळीकडे देशभर स्वातंत्र्यासाठी आंदोलने, मोर्चे, सभा वगैरे चालु होत्या. स्नेहलताताईंचे वडील श्री हरदत्त शर्मा आणि श्रीधर गणेश वझे, दोघेही सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीचे सक्रिय सभासद व लाइफ मेंबर होते. एक लाहोरमध्ये आणि दुसरे पुण्यामध्ये कार्यरत होते. दोघेही सोसायटीच्या मीटिंग निमित्त देशभर, पुणे-मुंबई येथे वारंवार  प्रवास करीत असत.
श्री हरदत्त शर्मा उर्फ बाबूजी आणि श्रीधर गणेश वझे उर्फ काका दोघे मित्र एकत्र काम करीत होते. त्यांचे स्वभाव सारखे, एकवाक्यता, एकमेका बद्दल प्रचंड आदर होता आणि दोघांनी ब्रिटीशांची नोकरी नाकारली होती.
स्नेहलता यांचे बालपण संगोपन तसेच प्राथमिक माध्यमिक शिक्षण लेडी मॅकलॅगन गर्ल्स हायस्कूल लाहोर येथे झाले. मध्यमवर्गीय कुटुंबातील बाबूजींची कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच होती, तरीही त्यांनी मुलांना कधी काहीही कमी पडू दिले नाही.  स्नेहलता कला शाखेची, त्यांना अध्यापन क्षेत्राची फार आवड होती. म्हणून 1943 मध्ये बीए पदवी धारण केल्यानंतर, अध्यापनाची आवड असल्याने, 1944 मध्ये बॅचलर ऑफ टिचिंग म्हणजे आत्ताचे B. ED,  कॉलेज ऑफ वुमन यूनिवर्सिटी लाहोर येथून पूर्ण केले.
बाबूजी एकदा मीटिंगच्या निमित्ताने पुण्याला आले होते, तेव्हा त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी स्नेहलता देखील बाबूजीं बरोबर पुण्यात आली.  स्वातंत्र्य पूर्वीचा काळ होता. वडील सोसायटीच्या कामात एवढे गुंतलेले असायचे की त्यांचा संपूर्ण वेळ सोसायटीच्या कामात जायचा. त्यामुळे स्नेहलता जवळजवळ पूर्ण वेळ श्रीधरपंतांकडे असायची. इकडे पुण्यात असताना, स्नेहलता पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समजल्यावर, श्रीधरपंतांनी आपल्या सहकाऱ्याच्या लाडक्या मुलीचे कौतुक करण्यासाठी आनंदाने सोसायटीच्या सर्व सभासदांना पेढे वाटले होते. त्यावेळेस त्यांना कुठे माहिती होते की हीच मुलगी त्यांची सून होईल.
 
इकडे यमुनाबाई व श्रीधरपंत यांचे चिरंजीव मोरेश्वर यांना देखील मुंबई मध्ये नोकरी लागली होती. मोरेश्वर हे देखील दर रविवारी पुण्यात यायचे. सहाजिकच स्नेहलता व त्यांचा परिचय झाला आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, आणि दोघांनी मनोमन लग्न करायचे ठरवले.
स्नेहलता वडिलांबरोबर लाहोर येथे निघाल्या ते मोरेश्वर यांच्याशी लग्न करायचे असे मनाशी पक्के करूनच. बाकी पूर्तता करायची होती ती म्हणजे आपल्या घरातील जेष्ठ मंडळींच्या संमतीची. इकडे मात्र मोरेश्वरची आई यमुनाबाई यांचा मनातून होकार होताच. पण त्या काही बोलत नव्हत्या कारण स्नेहलता यांच्यात खोड काढायला कुठेही जागा नव्हती. त्यांना काळजी होती ती परप्रांतातील मुलगी पंजाब आणि महाराष्ट्राची मने, संस्कृती,भाषा, राहणीमान, आवडीनिवडी कशा जुळवायचा इत्यादी. अनेक शंकाकुशंका मनात येत होत्या. दरम्यान श्री हरदत्त बाबूजीं कडूनच लग्नाच्या बाबत पत्र आल्याचे श्रीधरपंतांनी यमुनाबाई सांगितले.
 
 
त्यातच श्रीधरपंतांकडे स्नेहलताच्या लग्नाची शिफारस श्री. हृदयनाथ कुंझरू यांनी केली त्यामुळे दडपण व जबाबदारी होती. कारण ते  दोघांचे कॉमन मित्र होते.  शिवाय प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी, भारतीय संविधान समितीचे सदस्य व सार्वजनिक व्यक्तिमत्व होते. अखेर स्नेहलता व श्री मोरेश्वर यांचे लग्न लाहोर येथे पूर्णपणे पंजाबी पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात पार पडले. लग्नास अनेक स्वातंत्र्यसेनानी, महाराष्ट्रियन मंडळी, अगदी नऊवारीत आले होते. योगायोग असा की वझे साहेबांच्या मुलाचं लग्न लाहोर येथे आहे असे समजल्यावर त्यावेळचे प्रसिद्ध क्रिकेटपटू श्री देवधर मॅच निमित्त लाहोर येथे आल्यामुळे लग्नास आवर्जून उपस्थित होते.
 
स्नेहलताने परप्रांतातून येऊन मराठी भाषाच नाही तर मराठी संस्कृती सुद्धा एवढी सहजगत्या आत्मसात केली याचं सगळ्यांनाच कौतुक होतं. स्नेहलताजींनी  अनेक वर्ष गिरगाव मुंबई येथील बाई रतन बाई पावली या शाळेत नोकरी केली. त्या गणित आणि इंग्रजी विषय शिकवायच्या. स्नेहलता मॅडम या एकदम कडक  शिस्तीच्या. त्यामुळे त्या स्वतःच म्हणायच्या की मी शाळेत काही लोकप्रिय वगैरे अजिबात नाही कारण मी शिस्तप्रिय आहे. स्नेहलता मॅडम कडक शिस्तीच्या जरी असल्या तरी आतून त्यांचे मन शहाळ्यातील खोबऱ्याच्या मलई सारखे होते.  
मुलांना समजेल असे विषय सोपे करून शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. एकदा त्यांनी मुलांना प्रत्येकाने पारंपरिक भारतीय वेशभूषा घालून येण्यास व भारतातील एका एका राज्याचा नकाशा काढून आणायला सांगितले. दुसऱ्या दिवशी शाळेत संपूर्ण भारताचा नकाशा काढून, त्यात राज्यांचे नकाशे विद्यार्थ्यांना लावण्यास सांगीतले. त्यामुळे  मुलांना प्रत्येक राज्याची आणि प्रांताची इथंभूत माहिती झाली.  प्रामुख्याने या गोष्टीची दखल शाळेने सुद्धा घेऊन त्यांना प्रोत्साहित केले होते.
स्नेहलताताईंची नेहमी दुपारची शाळा असायची, त्यामुळे त्या घरातील सर्व कामे आटोपून सर्वांच्या नंतर निघायच्या आणि यजमान श्री मोरेश्वराचे घरी यायच्या आतच त्या घरी यायच्या. ह्यामुळे ते त्यांना नेहमी चिडवायचे, काय काम करता? मी कामावर जातानाही  तुम्ही घरी आणि कामावरून येण्याच्या आतही घरी ! मजा आहे बाबा तुम्हा लोकांची. 
 
खरं म्हणजे त्या मध्यमवर्गीय चाकरमानी घारातल्या. पण आपल्या जेष्ठ चिरंजीवास पदवीत्तर शिक्षण दिल्ली आणि मग अहमदाबाद येथे, कनिष्ठ चिरंजीवांना  आय. आय. टी. कानपूरला पाठवलं. मुलांना कधीच असं वाटू दिलं नाही की आपल्याकडे कशाची कमतरता आहे. कुठल्याही बाबतीत मुलगा आणि मुलगी असा भेदभाव होत नसे, त्यामुळे त्यांची मुलगी नीलिमा हीने पण रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून एम. एस. सी. (केमिस्ट्री) पूर्ण केली. या सर्वात  महत्त्वाची गोष्ट अशी की शंभरीत प्रवेश करेपर्यंतच्या आयुष्यात कधीही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले नाही. ती पण अगदी वाखाणण्या जोगी गोष्ट आहे. या सर्व गोष्टी आयुष्यात शिस्त पाळल्यामुळे घडू शकतात हे त्यांनी दाखवून दिले आहे.
 
परावलंबित्व त्यांना कधीही मान्य नव्हते शंभरीतही शक्य होईल तेवढे काम त्या स्वतःच करण्याचा प्रयत्न करीत.  त्यांना नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार असून सर्व  उच्च पदावर आहेत.
शब्दांकन: एकनाथ सोनवणे