Regd. No. Mum/00201/2501/NA

In Heaven

Don't take your organ to heaven ,heaven knows they need it here.
In Heaven

हेमलताताईं वसंत खळे

आपटे काका - काकू आणि V4ऑर्गन्स फाउंडेशनचा परिवार यांना नमस्कार.
 
दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी माझ्या आई, " हेमलता वसंत खळे " यांचे 81व्या वर्षी  दुःखद निधन झाले त्यावेळी आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांनी  आम्हा  खळे कुटुंबियांना आपुलकीने जो मदतीचा हात दिलात आणि आम्हाला त्वचादान, नेत्रदान व देहदान करण्यासाठी जे मार्गदर्शन केले त्याबद्दल शतशः धन्यवाद.
 
माझ्या आईने 2000 साली देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हा तिने डोंबिवलीतील महर्षि दधीचि देहदान मंडळ, डोंबिवली येथे तांबेसरांकडे फॉर्म भरला होता. विटनेस म्हणून मला सही करण्यास सांगितले तेव्हा मी विचारले नेत्रदान व अवयवदान ठीक आहे पण देहदान कशासाठी करायचे? त्या वेळी तिने सांगितले की देहदानामुळे विद्यार्थी डॉक्टरकी शिकतील. तिला शिकायची खूप इच्छा होती. तिच्या चारी नातवंडांना ती नेहमी खूप शिका, मोठे व्हा, असाच आशीर्वाद द्यायची. तिचे विचार काळाच्या खूप पुढे होते. तिने बऱ्याच परिचितांना, त्यांनी मुलांना शिकवावे म्हणून मदत केली होती. बऱ्याच जणांचे जीवन उंचावण्यात मदत केली होती. हे आम्हाला हेमलताताईंच्या निधनानंतर भेटावयास आलेल्या काही परिचितांनी सांगितले. त्यापैकी काहीजण, हेमलताताईंचा आदर्श मानून देहदानासाठी  नोंदणी करण्यास प्रेरित झाले.
 
नेत्रदान केल्यानंतर काही काळानी नेत्रबँकेच्या डॉक्टरांकडून समजले की कै. आईच्या नेत्राची स्थिती चांगली असल्याने ज्यांना ते नेत्र प्रत्यारोपित केले जातील  ती व्यक्ती जग बघू शकेल. हे जेव्हा कळले तेव्हा आम्हाला दुःखातसुद्धा खूप आनंद झाला.
 
 रिलायन्स हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी सुद्धा आम्हाला अजिबात घाई न करता मनापासून मदत केली. त्यांचे दोन डॉक्टर्स व नर्स देहदानासाठी  ॲम्बुलन्स पर्यंत सोडावयास आले आणि त्यांचे एक डॉक्टर एमजीएम कॉलेज पर्यंत देहदानासाठी आले. 
 
नेत्रदान बरेच जण करतात पण त्वचादान  फारच कमी लोक करतात. परंतू आपटेकाकांनी त्वचादानाने जळीत रुग्णांचे प्राण वाचवता येतात, ही आम्हाला ज्ञात नसलेली बहुमूल्य माहिती दिली व नॅशनल बर्न्स सेंटरशी समन्वय साधून त्यांच्या डॉक्टरांना पाचारण केले. स्कीन बँकेच्या डॉक्टरांनी व सेवक वर्गाने आईचे त्वचादान पूर्ण झाल्यावर आईला सन्मानपूर्वक साडी नेसवली .
 
एमजीएम चे डॉक्टर माने यांनी सुद्धा आम्हाला देहदानाबद्दल सर्व माहिती व्यवस्थित समजावून सांगितली. आमच्या आईच्या देहदानामुळे, त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वैद्यकिय प्रशिक्षणात खूप उपयोग होणार आहे. त्यामुळे आमचे विद्यार्थी चांगले यशस्वी डॉक्टर होतील.
 
रिलायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर्स व स्टाफ, अर्पण आय बँकचे डॉक्टर्स व स्टाफ,  नॅशनल बर्न्स सेंटर स्किन बँकेचे डॉक्टर्स व स्टाफ, एमजीएम कॉलेज चे डॉक्टर माने आणि त्यांचा स्टाफ आणि या सर्वांशी प्रभावी समन्वयन करणारे V4 ऑर्गन्स  फाउंडेशन परिवार आणि आपटेकाका - काकू या सर्वांनी माझ्या आईची अंतिम इच्छा पूर्णत्वास नेण्याचे सतकृत्य केले, त्या सर्वांचे मी किशोर वसंत खळे, समस्त खळे परिवार आणि माझी बहीण राजश्री वाकसकर, समस्त वाकसकर परिवार शतशः ऋणी राहू.