शिवपुराणामध्ये एक कथा आहे. त्या कथेनुसार शंकरांना त्यांच्या एका भक्ताची परीक्षा घ्यायची इच्छा होते. तो भक्त शिकारी असतो. रोज मनोभावे शंकर भगवानांची पूजा करीत असे. एके दिवशी शंकर भगवानांची पूजा करीत असताना भगवानांचा एक डोळा लाल होताना त्याला दिसतो. त्यातून रक्ताची धार लागलेलीही त्याला दिसते. तो शिकारी त्वरित आपल्या जवळील एका हत्याराने आपला एक डोळा काढून शंकराला अर्पण करतो. लगेच त्याला मूर्तीच्या दुसऱ्याही डोळ्यातून रक्ताची धार लागलेली दिसते. तो पुढचा मागचा विचार न करता दुसराही डोळा भगवानांना अर्पण करतो. शंकर भगवान प्रकट होऊन त्याला पुन्हा पूर्वीसारखी दृष्टी देतात आणि त्याच्या भक्तीची प्रशंसा करतात. त्याला कैलासावर कायमचे स्थान देतात. हिंदू धर्मामधील वेगवेगळ्या ग्रंथांमधून अशा वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या कथा असंख्य पसरलेल्या आहेत. दधिची ऋषि यांची कथा आहे. कर्णाची कथा आहे. शिबी राजाची कथा आहे. अशा अनेक कथा आपल्याला अनेका़नाच माहिती आहेत. परंतु अशा अनेक कथा असू शकतील ज्या माहिती नाहीत. त्यांचा शोध घेऊन त्यांचा उपयोग या धर्म मान्यतेसाठी व्हावा म्हणून या कथा धार्मिक कथा-कीर्तनकारांकडून समाजाला सांगितल्या गेल्यास हिंदू समाजाच्या मान्यतेची मोहोर त्यावर उमटू शकेल. इतरही धर्मांमध्ये अशा कथा असणे शक्य आहे. त्या त्या धर्माच्या कार्यकर्त्यांनी अभ्यास करून याबाबतीत त्या त्या धर्माच्या धर्मोपदेशकांशी चर्चा करून अवयवदाना बाबत जनजागृती साठी त्यांच्या सहकार्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आपण नेहमी म्हणतो
"पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराssम, गोपाल कृष्ण महाराज की जय"
हे उच्चारत असताना हे लक्षात घेतले पाहिजे की या सर्व व्यक्तींनी धर्माच्या अनेक वर्षांच्या परंपरांच्याविरोधात समाजाला जागृत केलं आहे. एक क्रांतिकारी विचार व आचार दिलेला आहे. धर्माच्या मार्गामध्ये क्रांती घडवून आणली आहे. प्रथम गोपालकृष्ण महाराजांचा विचार करू श्रीकृष्णाने अनेक क्रांतिकारी विचार मांडलेले आहेत. परंतु प्रथमच प्लहानपणी गोकुळात असताना त्यांनी पहिला क्रांतिकारी विचार मांडला. तो म्हणजे 'इंद्राची पूजा बंद करा'. अनेक वर्षे किंबहुना त्यावेळच्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे धर्माच्या सुरुवातीपासूनच इंद्राची पूजा करण्याची पद्धत होती. परंतु पहिला छेद त्याला श्रीकृष्णाने दिला. कोण इंद्र ? त्याचा काय संबंध ? तुम्हाला हा पर्वत अन्न देतो या गायी, गुरे दूध देतात. पूजा करायची असेल तर यांची करा. जो आपल्याला माहिती नाही ज्याला आपण पाहिला नाही अशा त्या इंद्राची पूजा कशाला करायची? त्यानंतर गोवर्धन पर्वताची वगैरे कथा सगळ्यांना माहितीच आहे. मूळ विचार म्हणजे जी हजारो वर्षाची परंपरा चालत आलेली आहे, ती मोडून नवीन परंपरा निर्माण करण्याचे पहिले श्रेय श्रीकृष्णा कडे जाते. त्यानंतर आपण नाव घेत असलेले दुसरे संत पुंडलिक. दरवाज्यात प्रत्यक्ष देव आलेला असतो. पण त्यासमोरस सुद्धा वीट फेकून वाट बघायला लावणारा आणि ईश्वरदर्शना पेक्षा सुद्धा कर्तव्य श्रेष्ठ आहे. आई-वडिलांच्या सेवेचे कर्तव्य मी करीत आहे आहे त्यामुळे परमेश्वरासाठी सुद्धा मी कर्तव्याला चुकणार नाही. असा एक क्रांतिकारी संदेश पुंडलिकाच्या कथेने दिला. ज्ञानेश्वरांनी तर हजारो वर्षे जे ज्ञान सामान्यांना मिळू नये असा प्रयत्न धर्माचे ठेकेदार करीत होते, तो प्रयत्न हाणून पाडला. धर्माचे ज्ञान संस्कृतातून प्राकृतात सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. ज्या ज्ञानेश्वरांना समाजाने वाळीत टाकले त्याच ज्ञानेश्वरांनी समाजाला धर्म म्हणजे काय हे शिकवले आणि सर्वसामान्यांच्या पर्यंत धर्मज्ञानाचा वारसा पोचवला. तुकाराम महाराजांनी अस्पृश्यतेवर अत्यंत कठोरपणे कोरडे ओढले आहेत. हा भेदाभेद समाजामधून नष्ट करण्यासाठी त्यांनी अखंड अथक प्रयत्न केले.
"जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा"
हा सामान्यांची सेवा करण्याचा नवा धर्मार्थ समाजाला शिकवला आणि देवाचे खरे स्थान समाजाला दाखवले. त्यामुळे धर्माने सांगितलेल्या ज्या गोष्टी कालानुरूप टाकाऊ झाल्या असतील ज्यामुळे खरा माणुसकीचा धर्म भ्रष्ट होत असेल अशा गोष्टी बदलल्या पाहिजेत. ही जाणीव अगदी कृष्णा पासून ते गाडगेबाबां पर्यंत अनेक संत महात्म्यांनी समाजाला करून दिलेली आहे. तरीही समाज सुधारणेसाठी सतत प्रयत्नशील राहावे लागते. त्यासाठी सतत समाजामध्ये संत निर्माण व्हावे लागतात. क्रांतीचे उद्गाते जन्मावे लागतात तरच धर्मातली घाण कमी कमी होऊन धर्म जास्तीत जास्त शुद्ध स्वरूपात समाजामध्ये प्रसृत होऊ शकतो. म्हणूनच श्रीकृष्णां पासून तै गाडगेबाबां पर्यंत वेळोवेळी अनेक संतांनी धर्मातील विकृती नष्ट करण्यासाठी आणि धर्माचा माणुसकीचा मूळ गाभा हा लोकांना समजावून सांगण्यासाठी अखंड प्रयत्न केले. येथून पुढेही ही असे संत खऱ्या अर्थाने ज्यांना संत म्हणता येईल असे समाजसुधारक निर्माण होत राहतील. राहिले पाहिजेत. आणि समाजाला कालमान परिस्थितीनुसार क्रांतिकारी विचार देऊन रूढी-परंपरां पेक्षा धर्माचा मूळ शुद्ध विचार जो माणूसकीचा आहे तो समाजाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत राहतील. तसे असेल तरच समाजाला धारण करणारा धर्म टिकू शकेल आणि समाजाचा विकास आणि मानवतेचा विकास ठरू शकेल.
( Mohan Foundation च्या वेबसाईटवर 'Religion & Organ donation' नावाच्या video मध्ये हिंदू धर्मपंडितांच्या मुखातून आपल्याला त्यांचा धर्म व अवयवदान या बद्दल पहाता -ऐकता येईल. तसेच श्री. श्री. रविशंकरजी, श्री. रामदेवबाबा, श्री. वामनराव पै यांचे अवयवदानाचा पुरस्कार करणारे video YouTube वर उपलब्ध आहेत.)
सुनील देशपांडे, नाशीक