Regd. No. Mum/00201/2501/NA

Articles

Don't take your organ to heaven ,heaven knows they need it here.
Articles

अवयवदान व शीख धर्म

आपल्या देशातील आणखी एक महत्त्वाचा धर्म म्हणजे शीख धर्म. या धर्माचे संस्थापक गुरू नानकजी असे म्हणतात "ज्या ठिकाणी स्वार्थ आहे त्या ठिकाणी देव नसतो आणि ज्या ठिकाणी देव असतो त्याठिकाणी स्वार्थ असूच शकत नाही"
ते असंही म्हणतात की "निस्वार्थ सेवा ही सर्वोच्च कृती असून त्यामार्गे मानवाला अमर होता येते स्वर्गामध्ये कायमचे स्थान मिळते."

शीख धर्मामध्ये व या धर्माच्या अनुयायांमध्ये निस्वार्थ सेवा ही सगळ्यात पराकोटीची महत्त्वाची सेवा आहे आणि शीख धर्माचे अनुयायी त्याचं श्रद्धेने पालन करत असतात. सेवे मधून कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी व कोणत्याही प्रकारची स्वार्थी वृत्ती कधीच दिसून येत नाही. सेवा करताना व दान करताना शिख धर्मीय,  धर्म जात पंथ रंग याबाबतचा कोणताही भेदभाव  कधीच करत नाहीत. जगामध्ये जेवढ्या जेवढ्या म्हणून नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडलेल्या आहेत, त्या सर्व ठिकाणी शीख  लोक मदतीसाठी त्वरित धावून जाताना आणि नुसती आर्थिक मदतच नव्हे तर प्रत्यक्ष स्वतः मदत कार्यात सामील होताना दिसतात.

नरु मरै नरु कामि न आवै, 
पसू मरै दस काज सवारै 
हे गुरुबानी मधील शब्द आपल्याला नक्कीच प्रेरणा देतील. मनुष्याचा मृत्यू झाला तर तो कुठल्याच कामाचा नसतो. पण पशूचा मृत्यू झाला तर त्याचे अनेक उपयोग होऊ शकतात.

त्याचप्रमाणे याबाबत असेही म्हणतात  की माणसांमधील माणुसकी मेली तर त्या माणसाचा काय उपयोग ?  माणसामधलं पशुत्व मेलं तर त्या माणसाचा समाजाला खरा उपयोग होईल. अशा दोन्ही अर्थाने हा श्लोक सांगितला जातो आणि दोन्ही अर्थाने तो अवयवदानाच्या बाबतीत खरा आहे. आपला देह मृत्यूनंतर जर इतरांचे प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्याचा नक्कीच उपयोग करावा.  दुसरे म्हणजे माणसातली माणुसकी जिवंत ठेवायची असेल तर त्यातलं पशुत्व नष्ट व्हायला पाहिजे.  पशुत्व नसलेला आणि माणुसकी  जिवंत असलेला मनुष्य सेवाकार्यात सर्वाधिक उपयोगी ठरू शकतो.  मग अवयवदान हे त्याच्या दृष्टीने एक माणुसकीचं काम होऊ शकतं. एका माणसाच्या मृत्यूनंतर अनेकांचा जीव वाचत असेल तर ते माणुसकीचं कृत्य हे नक्कीच धर्माला मान्य असणारच.  जिवंतपणी तर आपण समाजाची सेवा करायची आहेच पण मृत्यूनंतरही समाजसेवा करण्याची संधी या अवयवदानाच्या क्षेत्राने मिळवून दिली असेल तर धर्माचा त्याला कसा विरोध असेल बरे ? आदरणीय गुरु गोविंद सिंग साहेब यांनीच सांगितलं होतं की.  ' माणुसकी हा एकच मूळ धर्म आहे, आणि  मानव सेवा हीच ईश्वर सेवा.'

शीख धर्मीय कधीही मानव सेवा करताना ती व्यक्ती कोणत्या धर्माची वा कोणत्या जातीची याचा कधीही विचार करत नाहीत. कोणत्याही गरजू मानवाची सेवा हीच ईश्वर सेवा समजून त्यांचं सेवा कार्य सतत चालू असतं.  ते त्यांच्या धर्म तत्त्वज्ञानाचं  मूळ आहे.  सर्व मानवजातीची सेवा करणं हेच सगळ्यात मोठं पुण्यकर्म आहे.  याच तत्त्वावर अवयवदानाच्या कार्याचाही पाया उभारलेला आहे. म्हणूनच शीख तत्वज्ञानाचा अवयवदानाच्या माणुसकीच्या कार्यासाठी कधीही विरोध असणे शक्य नाही.

( Mohan Foundation च्या वेबसाईटवर 'Religion & Organ donation' नावाच्या video मध्ये शीख धर्मपंडितांच्या मुखातून आपल्याला शीख धर्म व अवयवदान या बद्दल पहाता -ऐकता येईल )

सुनील देशपांडे, नाशीक