Regd. No. Mum/00201/2501/NA

Articles

Don't take your organ to heaven ,heaven knows they need it here.
Articles

अवयवदान व जैन धर्म

जैन धर्म सुद्धा सत्य, अहिंसा व सदाचरण या त्रिसूत्रींचा पुरस्कार करतो. शरीर आणि आत्मा यांमध्ये स्पष्ट फरक जैन धर्माने सांगितला आहे.  ज्या क्षणी माणसाचा मृत्यू होतो त्याक्षणी आत्मा शरीरापासून विलग होतो आणि शरीर ही एक निरुपयोगी गोष्ट ठरते.  त्यामुळे ज्या गोष्टीचा काहीच उपयोग नाही त्या गोष्टीच्या दानातून जर कोणाला नवजीवन मिळत असेल तर हे सत्कृत्यच होय असे जैनधर्मीय मानतात.  जैन धर्मामध्ये अवयवदानाला कोणताच प्रतिबंध नाही.  सर्व जगामध्ये जैन धर्मीयांमध्ये अवयवदानाचे प्रमाण जास्त आढळते.  विशेषतः भारतामध्ये जैन धर्मीयांमध्ये नेत्रदानाची नवी परंपरा अनेक ठिकाणच्या जैन समुदायांमध्ये निर्माण झाली आहे.  नेत्रदानाचे प्रमाण जैन धर्मीयांमध्ये कितीतरी जास्त आहे. 

जैन धर्माच्या शिकवणीमध्येच शरीराचे लाड न पुरवता मनाच्या अंत:शुद्धीकडे लक्ष द्यावे असे सांगितले आहे.   सर्व प्राणीमात्रांबाबत सहानुभूतीची व आपुलकीची भावना ठेवा अशीच जैन धर्माची शिकवण आहे. ही शिकवण अवयवदानाच्या प्रक्रिये साठी समर्पक आहे. जैन धर्मामध्ये असे सांगितले आहे की पुढच्या जन्माचा संबंध हा या जन्मात तुम्ही जे कर्म केले आहे त्याच्याशी आहे.  देहाशी अजिबात पुढील जन्माचा संबंध नाही.  त्यामुळेच जैन तत्त्वज्ञानाची संगती अवयवदानाशी लावल्यास आपण असे म्हणू शकतो की अवयवदान करण्यामुळे पुढील जन्मामध्ये त्याचा काहीही परिणाम होणार नाही. जैन धर्म पुरस्कृत 'लौकिक दान' म्हणजेच निरपेक्ष बुद्धीने केलेले दान. अशा दानाचे महत्व आणि पुण्य सगळ्यात मोठं आहे असं जैन धर्मिय मानतात. निरपेक्ष दान करतानासुद्धा ते दान विशिष्ट जाती-जमाती धर्म-पंथ अशाच व्यक्तींना झालं पाहिजे असा कोणताही आग्रह जैनधर्मीय कधीच धरत नाहीत.  कोणत्याही मनुष्याला किंवा प्राण्याला त्याचा निश्चित उपयोग झाला पाहिजे येवढाच आग्रह त्या दानाबाबत असतो.

एकंदरच बुद्ध आणि जैन या दोन धर्मांचा अवयवदानाला विरोध तर नाहीच पण पाठिंबाच असला पाहिजे असे त्यांचे तत्वज्ञान सांगते असे म्हटल्यास वावगे ठरू नये.  त्यामुळे याबाबतीत जैन आणि बुद्ध धर्मीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या धर्माचा अधिक अभ्यास करून या मुद्द्यावर जास्त प्रकाश टाकणं गरजेचं आहे.   बौद्ध आणि जैन कार्यकर्त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी याबाबत विशेष मार्गदर्शन करावं.

सुनील देशपांडे, नाशीक