Regd. No. Mum/00201/2501/NA

Articles

Don't take your organ to heaven ,heaven knows they need it here.
Articles

अवयवदान व बौद्ध धर्म

आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: आशिया खंडात मोठ्या प्रमाणात प्रसार झालैला धर्म म्हणजे बौद्ध धर्म.  या धर्माची मूळ तत्वे म्हणजेच दया, प्रेम, मैत्री व करुणा.   त्या तत्वांचा आविष्कार म्हणजेच अहिंसा. 'बुद्ध आणि त्याचा धर्म' या पुस्तकामध्ये गौतम बुद्ध त्यांच्या पहिल्या प्रवचना मध्ये दाना बद्दल असे म्हणतात 

" स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न बाळगता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय" यावरून दान हे बुद्ध धर्मामध्ये  सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे हे लक्षात येईल. बुद्धांच्या एका पूर्वजन्मा मध्ये भुकेलेल्या वाघिणीचे प्राण वाचवण्यासाठी बुद्धांनी आपले शरीर देऊ केल्याचा उल्लेख आढळतो.  त्याच प्रमाणे बुद्धांनी आधीच्या आणखी एका जन्मा मध्ये वणवा लागलेल्या जंगलात सापडलेल्या एका भुकेलेल्या शेतकऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी त्याची भूक भागावी म्हणून सशाच्या रूपात त्या जंगलात त्या शेतकऱ्यांसमोर प्रकट झाल्याचा उल्लेख आढळतो.

बुद्धिस्ट सोसायटीचे चेअरमन डॉ. डेस्मंड विदुल्प म्हणतात "माझ्या मृत्यूनंतर दुसऱ्याला मी जीवदान देऊ शकत असेन तर माझे काय नुकसान आहे बरे ?"   बुद्ध धर्म अवयव दानासाठी किंवा देहदानासाठी विरोध करीत नाही.  तरी कांही बुद्ध गुरूंचे म्हणणे असे आहे की,  हा निर्णय प्रत्येकाचा वैयक्तिक स्वरूपाचा असला पाहिजे. जो दाता आहे त्याची इच्छा सर्वात जास्त महत्वाची आहे.  देहदानाच्या बाबतीत अथवा मृत्यूनंतरच्या अवयवदानाच्या बाबतीत, दात्याने मृत्यूपूर्वी तशी इच्छा व्यक्त केली असली पाहिजे.  या सर्वांवरून निरपेक्ष बुद्धीने केलेले दान बुद्ध धर्माला मान्य आहे.  त्यामुळेच आर्थिक प्राप्ती साठी केलेल्या दानाला बुद्ध धर्माचा प्रखर विरोध आहे.  सामाजिक कर्तव्या पोटीच हे दान व्हायला पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. 

काही बौध्द धर्मगुरूंचे म्हणणे आहे की माणूस मेल्यानंतर सुद्धा देहाच्या प्रेमापोटी काही काळ त्याचा आत्मा देहाशीच घोटाळत राहिलेला असतो.  त्यामुळे त्या व्यक्तीने पूर्वी इच्छा  व्यक्त केली असेल तरच ते अवयवदान योग्य ठरेल अन्यथा ते त्याच्या आत्म्याला क्लेशकारक ठरू शकते.

( Mohan Foundation च्या वेबसाईटवर 'Religion & Organ donation' नावाच्या video मध्ये बौद्ध धर्मपंडितांच्या मुखातून आपल्याला त्यांचा धर्म व अवयवदान या बद्दल पहाता -ऐकता येईल )

सुनील देशपांडे, नाशीक